मंडळी आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात बँकेत प्रत्यक्ष जाऊन रांगेत उभं राहून पैसे काढण्याऐवजी एटीएमचा वापर करणं अधिक सोयीचं ठरतं. देशभरातील विविध बँकांची एटीएम यंत्रे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे काही मिनिटांत पैसे काढणे शक्य होतं. पण आता एटीएममधून पैसे काढणं महाग होणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) इंटरचेंज शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांनी मोफत मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी दोन रुपये जास्त मोजावे लागतील. हा निर्णय १ मे पासून लागू होईल, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होणार आहे.
यापूर्वी मोफत व्यवहार मर्यादा संपल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी १७ रुपये शुल्क आकारले जात होते. आता त्यात दोन रुपयांची वाढ होऊन हे शुल्क १९ रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे बिगर-आर्थिक व्यवहारांसाठीही एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच, फक्त बँक खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठीसुद्धा आता सहा ऐवजी सात रुपये मोजावे लागतील.
ही शुल्कवाढ देशभर लागू होईल, ज्याचा विशेषत: लहान बँकांच्या ग्राहकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक लहान बँका एटीएमसाठी मोठ्या वित्तीय संस्थांवर अवलंबून असतात. त्यामुळे वाढलेल्या खर्चाचा भार त्यांच्यावर अधिक जाणवेल.
डिजिटल व्यवहारांना चालना
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे डिजिटल व्यवहार अधिक प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. डिजिटल पेमेंट पद्धती या सोप्या आणि किफायतशीर असल्याने ग्राहक त्यांचा अधिकाधिक वापर करतील. सरकारनेही रोख व्यवहार कमी करण्यासाठी डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिलं आहे.
इंटरचेंज शुल्क म्हणजे काय?
इंटरचेंज शुल्क म्हणजे एका बँकेने दुसऱ्या बँकेला दिलेली रक्कम, जेव्हा एखादा ग्राहक दुसऱ्या बँकेच्या एटीएमचा वापर करतो. उदाहरणार्थ जर तुम्ही ICICI बँकेच्या एटीएममधून HDFC बँक कार्ड वापरून पैसे काढले, तर HDFC बँक ICICI बँकेला इंटरचेंज शुल्क म्हणून ठराविक रक्कम देते. हे शुल्क बँक ग्राहकांकडून वसूल करते.
या शुल्कवाढीमुळे ग्राहकांनी पैसे काढताना अधिक काळजीपूर्वक विचार करावा लागेल. डिजिटल व्यवहारांचा अधिकाधिक अवलंब करणं ही या बदलावरची सर्वोत्तम प्रतिक्रिया ठरू शकते.