नमस्कार मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील बँकांकडे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे – एका बँकेने एकाच ग्राहक वर्गासाठी अनेक मोबाइल ॲप्स तयार करणे आवश्यक आहे का? बँकांनी यावर स्पष्टता द्यावी, अशी मागणी आरबीआयने केली आहे.
मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, अलीकडील काळात अनेक बँकिंग ॲप्समध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक अधिक सतर्क झाली असून काही बँकांना याबाबत चौकशी केली आहे.
आरबीआयकडून यावर कोणतेही अधिकृत निवेदन अद्याप प्रसिद्ध झालेले नाही, तसेच मनीकंट्रोलच्या ईमेलला उत्तर दिलेले नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, आरबीआयने बँकांना एकाच प्रकारच्या ग्राहकांसाठी अनेक ॲप्स सुरू करण्याच्या धोरणाचा पुनर्विचार करण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. बँकांना याबाबत उत्तर देण्यासाठी जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
एका वरिष्ठ बँक अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्य ॲप आणि इतर नवीन ॲप्समध्ये तांत्रिक गुंतवणूक विभागली जाते. त्यामुळे ग्राहकांचा अनुभवही गोंधळात टाकणारा ठरतो. ग्राहकांना कोणते ॲप वापरायचे, कुठे खाते उघडायचे आणि व्यवहारांसाठी कोणते ॲप उपयुक्त आहे, याबाबत स्पष्टता राहत नाही.
उदाहरणार्थ कोटक महिंद्राकडे कोटक बँक आणि कोटक ८११, इंडसइंड बँकेकडे इंडसइंड आणि इंडी, तर एचडीएफसी बँकेकडे एचडीएफसी बँक आणि पेझॅप ही दोन ॲप्स आहेत. ही सर्व ॲप्स किरकोळ ग्राहकांसाठीच असून जवळपास सारखीच सेवा देतात.
रिझर्व्ह बँकेच्या मते या प्रकारामुळे तांत्रिक संसाधनांचा अपव्यय होतो. टीम्स, निधी आणि विपणन प्रयत्न यामध्ये दुहेरी कामगिरी केली जाते. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमही वाढतो.
सुमारे चार-पाच वर्षांपूर्वी अनेक बँकांनी डिजिटल बँकिंग या संकल्पनेवर भर देत वेगवेगळ्या ॲप्स सुरू केली होती. मात्र आता आरबीआय बँकांना अधिक स्पष्ट, एकसंध आणि कार्यक्षम डिजिटल धोरण स्वीकारण्याचे आवाहन करत आहे.