मित्रांनो निवृत्तीनंतर आपली बचत सुरक्षित आणि उत्पन्नदायक ठिकाणी गुंतवावी, अशी बहुतांश ज्येष्ठ नागरिकांची अपेक्षा असते. त्यामुळे बरेचजण आपले पैसे बँकांच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवतात. बँका ज्येष्ठ नागरिकांना इतरांपेक्षा अर्धा टक्क्याने अधिक व्याज देतात, म्हणूनही हा पर्याय लोकप्रिय आहे.
मात्र मुदत ठेवींपेक्षा अधिक चांगला परतावा देणारा आणि सरकारच्या पाठबळाने सुरक्षित असलेला एक पर्याय म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना. ही योजना केंद्र सरकारकडून चालवली जाते आणि यामध्ये सध्या ८.२ टक्के वार्षिक व्याज दिले जाते, जे बहुतांश एफडीपेक्षा जास्त आहे.
या योजनेत कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त तीस लाख रुपये गुंतवता येतात. गुंतवणूक कालावधी पाच वर्षांचा आहे. ही रक्कम पाच वर्षांनंतर परत मिळते. यामध्ये जमा केलेल्या रकमेवर दर तीन महिन्यांनी व्याज दिले जाते, त्यामुळे नियमित उत्पन्नाचा स्रोतही निर्माण होतो.
जर पाच वर्षांनंतर गुंतवणूकदाराला योजना सुरू ठेवायची असेल, तर मॅच्युरिटीच्या एका वर्षाच्या आत खात्याची मुदत तीन वर्षांसाठी वाढवता येते. या मुदतवाढीच्या कालावधीत त्या वेळेस लागू असलेल्या व्याजदरानुसार व्याज दिले जाते. योजनेतील गुंतवणुकीवर आयकर कलम ८०C अंतर्गत करसवलतही मिळते.
उदाहरणार्थ जर कोणी या योजनेत तीस लाख रुपये गुंतवले, तर त्याला दर तीन महिन्यांनी सुमारे ६१,५०० रुपये व्याज मिळते. पाच वर्षांत एकूण व्याजाची रक्कम सुमारे बारा लाख तीस हजार रुपये होते आणि गुंतवलेली मूळ रक्कम धरून एकूण मिळकत होते सुमारे बत्तेचाळीस लाख रुपये.
जर कोणी पंधरा लाख रुपये गुंतवले, तर त्याला दर तीन महिन्यांनी सुमारे ३०,७५० रुपये व्याज मिळते. पाच वर्षांत एकूण व्याज सुमारे सहा लाख पंधरा हजार रुपये होते आणि एकूण मिळकत होते एकविस लाख पंधरा हजार रुपये.
ही योजना ६० वर्षे वय पूर्ण केलेल्या व्यक्तींसाठी खुली आहे. तसेच, सरकारी किंवा संरक्षण सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाही काही अटींअंतर्गत ही योजना उपलब्ध आहे.
एकूणच, ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही सुरक्षित गुंतवणूक, नियमित उत्पन्न आणि करसवलतीचा लाभ देणारी विश्वासार्ह योजना आहे.