मंडळी गेल्या दोन वर्षांत भारतातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमती सरासरी 18 टक्क्यांनी वाढल्या आहेत. प्रॉपइक्विटीच्या अलीकडील अहवालानुसार, घरांच्या सरासरी किमती आता ₹7,989 ते ₹34,026 प्रति चौरस फूट इतक्या झाल्या आहेत. त्यामुळे घर खरेदीचा खर्च वाढल्यामुळे अनेक लोक त्यासाठी आर्थिक नियोजन करत आहेत. अशा वेळी गृहकर्ज घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी आपला क्रेडिट स्कोअर तपासणे महत्त्वाचे ठरते. चांगल्या क्रेडिट स्कोअरमुळे तुम्हाला कमी व्याजदर मिळू शकतो. साधारणपणे 750 पेक्षा जास्त स्कोअर असल्यास तो चांगला मानला जातो. जर स्कोअर कमी असेल, तर कर्ज घेण्याची घाई न करता आधी तो सुधारण्यावर लक्ष द्यावे. क्रेडिट स्कोअर 700 पेक्षा कमी असल्यास बँका कर्ज नाकारू शकतात. अशा वेळी एनबीएफसी किंवा हाउसिंग फायनान्स कंपन्यांकडून कर्ज मिळू शकते, परंतु त्यांचे व्याजदर तुलनेत जास्त असतात.
दोन व्यक्तींनी एकत्र कर्ज घेतल्यास म्हणजे संयुक्त कर्ज घेतल्यास पात्रतेत वाढ होते. उदाहरणार्थ, तुम्ही 40 लाख रुपयांपर्यंत पात्र असाल आणि सहकर्जदारही तेवढ्याच रकमेसाठी पात्र असेल, तर मिळून 80 लाख रुपयांचे कर्ज घेता येते. शिवाय, जर सहकर्जदार महिला असेल, तर काही बँका तिला थोडी व्याज सवलतही देतात.
घर खरेदी करताना शक्य असल्यास जास्त रक्कम डाउन पेमेंट म्हणून भरावी. त्यामुळे कर्ज रक्कम कमी राहते आणि व्याजदराचा भार कमी होतो. उदाहरणार्थ, 1 कोटी रुपयांचे घर घेताना 75 लाखांचे कर्ज घेण्याऐवजी अधिक रक्कम स्वतःकडून भरल्यास फायद्याचे ठरते.
वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जांच्या अटींची आणि व्याजदरांची तुलना करणे उपयुक्त ठरते. चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास व्याजदरावर वाटाघाटीची संधी असते. प्रक्रियाशुल्क, कायदेशीर शुल्क आणि इतर शुल्कांचीही तुलना करून निर्णय घ्यावा.
कर्ज कालावधी लहान ठेवला तर एकूण व्याज कमी भरावे लागते. उदाहरणार्थ, 20 वर्षांच्या कालावधीऐवजी 15 वर्षांचे कर्ज घेतल्यास EMI थोडा जास्त लागेल, पण एकूण व्याज कमी होईल.
काही बँका ओव्हरड्राफ्ट लिंक्ड होम लोन सुविधा देतात. यात कर्ज खात्यात अधिक रक्कम जमा केल्यास त्या रकमेवर व्याज लागत नाही, आणि गरज असल्यास ती रक्कम पुन्हा वापरता येते. ही सुविधा थोडी महाग असली तरी, व्याज वाचवण्यासाठी फायदेशीर ठरते.
प्रीपेमेंट केल्याने कर्जाचा कालावधी आणि एकूण व्याज खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. उदाहरणार्थ, दरवर्षी उर्वरित कर्जाच्या 5 टक्के रक्कम आगाऊ भरल्यास 20 वर्षांचे कर्ज 12 वर्षांत संपवता येते. मात्र, प्रत्येक बँकेच्या प्रीपेमेंटच्या अटी वेगळ्या असतात, त्या समजून घेतल्या पाहिजेत.
या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही अधिक सुज्ञपणे गृहकर्ज घेण्याचा निर्णय घेऊ शकता. यामुळे तुमचं घराचं स्वप्न पूर्ण करताना आर्थिक स्थैर्य टिकवता येईल.