नमस्कार मंडळी आजच्या काळात गरजा भागवण्यासाठी कर्ज घेण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. घर, कार किंवा इतर मोठ्या खरेदीसाठी बँकांकडून कर्ज घेणं सामान्य झालं आहे. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर आणि परतफेडीचा इतिहास पाहून बँका वेगवेगळ्या ऑफर्स देतात. कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्जाची जबाबदारी कोणावर येते, याविषयी जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
कर्ज वसुलीचे नियम काय आहेत?
जर कर्जदाराचा मृत्यू झाला, तर बँक सर्वप्रथम कर्जाच्या सहअर्जदाराशी संपर्क साधते. जर सहअर्जदार नसेल किंवा तो परतफेडीस असमर्थ असेल, तर जामीनदाराशी संपर्क केला जातो. जामीनदारानेही कर्जाची परतफेड नाकारल्यास बँक कायदेशीर वारसांशी संपर्क साधते.
बँका वारसांना थकीत कर्जाची रक्कम भरण्याची विनंती करतात. जर सहअर्जदार, जामीनदार किंवा वारस कोणीच कर्जाची जबाबदारी घेण्यास तयार नसतील, तर बँक कर्ज वसुलीसाठी शेवटच्या उपायांचा अवलंब करते.
मालमत्ता जप्ती आणि लिलाव
कर्जाच्या वसुलीसाठी बँक मृत कर्जदाराची मालमत्ता जप्त करू शकते. जर गृहकर्ज किंवा वाहन कर्ज घेतलं असेल, तर बँक घर किंवा वाहन जप्त करून लिलावाच्या माध्यमातून ते विकते. यामुळे कर्जाची थकीत रक्कम वसूल केली जाते.
व्यक्तिगत कर्जाच्या बाबतीत, बँक कर्जदाराच्या इतर मालमत्तांवरही दावा करू शकते. कोणत्याही प्रकारे थकीत कर्जाची वसुली झाली नाही, तर बँक कायदेशीर प्रक्रिया राबवून मालमत्तेचा लिलाव करते.
कर्ज घेताना सहअर्जदार आणि जामीनदाराची भूमिका महत्त्वाची असते. तसेच योग्य विमा संरक्षण घेणंही आवश्यक आहे. अशा प्रकारे, कर्ज परतफेडीविषयीची जबाबदारी ओळखूनच पुढे जाणं शहाणपणाचं ठरेल.