सिबिल स्कोअर हा तुमच्या आर्थिक विश्वासार्हतेचा एक महत्त्वाचा मापदंड आहे. भविष्यात कर्ज किंवा नवीन क्रेडिट कार्ड मिळवायचे असल्यास हा स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. काही वेळा सर्व पेमेंट वेळेवर करूनही स्कोअर कमी होतो. हे टाळण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.
सर्वप्रथम क्रेडिट कार्डचा मर्यादित वापर करावा. क्रेडिट लिमिटच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम खर्च करणे टाळावे. उदाहरणार्थ जर तुमची क्रेडिट लिमिट १ लाख रुपये असेल, तर ३०,००० रुपयांपेक्षा जास्त खर्च करणे टाळावे. क्रेडिट लिमिटच्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त वापर केल्यास सिबिल स्कोअर कमी होऊ शकतो.
जर तुमचे उत्पन्न स्थिर असेल आणि पेमेंट इतिहास चांगला असेल, तर बँकेला क्रेडिट लिमिट वाढवण्याची विनंती करावी. यामुळे तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो कमी राहील आणि स्कोअर सुधारण्यास मदत होईल.
जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील, तर खर्च दोन-तीन कार्डांमध्ये विभागावा. यामुळे एका कार्डाचा जास्त वापर होणार नाही आणि क्रेडिट स्कोअर कायम चांगला राहील.
क्रेडिट कार्डवरील खर्च मर्यादेपेक्षा वाढू नये, यासाठी मोबाइल एप किंवा एसएमएस अलर्ट सेट करावेत. ३० टक्क्यांपेक्षा जास्त खर्च झाल्यास अलर्ट मिळाल्याने खर्च नियोजन करणे सोपे जाईल.
सतत क्रेडिट लिमिटच्या जवळ पोहोचल्यास किंवा ओलांडल्यास बँका तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत समजू शकतात. त्यामुळे भविष्यात कर्ज किंवा नवीन क्रेडिट कार्ड मिळवणे कठीण होऊ शकते.
सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी जुना क्रेडिट इतिहास चांगला असणे आवश्यक आहे. जुन्या आर्थिक व्यवहारांचा प्रभाव ७ वर्षांपर्यंत राहतो. त्यामुळे आर्थिक शिस्त पाळून पेमेंट वेळेवर करावे आणि क्रेडिट कार्ड योग्य प्रकारे वापरावे.
चांगला सिबिल स्कोअर राखण्यासाठी खर्च व्यवस्थापन, वेळेवर पेमेंट आणि योग्य क्रेडिट वापर यावर लक्ष द्यावे. यामुळे भविष्यात कर्ज किंवा नवीन क्रेडिट कार्ड सहज मिळू शकते.