मंडळी गावाकडून शहरात आलेल्या प्रत्येकाला स्वतःच्या हक्काचे घर असावे, असे वाटते. पण घरांच्या वाढत्या किमतीमुळे हे स्वप्न पूर्ण करणे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. जर तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही स्मार्ट निर्णय घेतल्यास तुम्हाला मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो. त्यातील एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे घर पत्नीच्या नावावर खरेदी करणे.
महिलांच्या नावावर घर खरेदीचे फायदे
केंद्र सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत असते. त्यानुसार, घर खरेदीसाठी महिलांना काही विशेष सवलती मिळतात.
1) अनेक बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या महिलांना पुरुषांपेक्षा कमी व्याजदराने गृहकर्ज देतात. त्यामुळे जर तुम्ही पत्नीसोबत किंवा तिच्या नावावर घर खरेदी केली, तर तुम्हाला गृहकर्जावर व्याजदर सवलतीचा लाभ मिळू शकतो.
2) घर खरेदी करताना मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरावे लागते, जे घराच्या एकूण किमतीच्या काही टक्के असते. भारतातील अनेक राज्यांमध्ये महिलांसाठी मुद्रांक शुल्क कमी आहे. त्यामुळे घर पत्नीच्या नावावर घेतल्यास तुमच्यावरचा हा आर्थिक भार कमी होऊ शकतो.
3) काही महापालिकांमध्ये महिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर कर सवलतीचा लाभ दिला जातो. त्यामुळे दीर्घकालीन कर बचतही करता येते.
4) घराच्या मालकीहक्कामुळे पत्नीची आर्थिक सुरक्षितता वाढते आणि तिला स्वावलंबी बनण्यास मदत होते. गरज पडल्यास ती स्वतंत्रपणे आर्थिक निर्णय घेऊ शकते.
जर तुम्ही घर खरेदीचा विचार करत असाल, तर पत्नीच्या नावावर घेणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामुळे तुम्हाला गृहकर्ज, मुद्रांक शुल्क आणि मालमत्ता करात विविध सवलती मिळू शकतात. शिवाय, हा निर्णय पत्नीच्या आर्थिक सक्षमीकरणासही हातभार लावतो. त्यामुळे घर खरेदी करताना या सर्व बाबींचा विचार करून योग्य निर्णय घ्या.