मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 9 एप्रिल रोजी 2025-26 या आर्थिक वर्षासाठीच्या पहिल्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम म्हणजे बँकांकडून दिल्या जाणाऱ्या होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनवरील व्याजदरात घट होईल आणि परिणामी ग्राहकांचा मासिक EMI कमी होईल.
समजा एखाद्या व्यक्तीने ₹50 लाखांचे होम लोन 20 वर्षांच्या कालावधीसाठी घेतले असेल. सध्याच्या 8.25 टक्के व्याजदरानुसार त्याचा मासिक EMI ₹42,603 इतका येतो. संपूर्ण कालावधीत हे कर्ज परत करताना जवळपास ₹52,24,788 इतके व्याज भरावे लागते, आणि एकूण परतफेड रक्कम ₹1,02,24,788 होते.
मात्र RBI ने जाहीर केलेल्या 0.25 टक्क्यांच्या कपातीनंतर व्याजदर 8.00 टक्क्यांवर येतो. त्यामुळे त्या व्यक्तीचा EMI ₹41,822 वर येतो. या दराने एकूण व्याज ₹50,37,281 इतके लागते आणि कर्जाची एकूण परतफेड रक्कम ₹1,00,37,281 होते.
या बदलामुळे मासिक EMI मध्ये ₹781 ची घट होते. संपूर्ण कर्जाच्या कालावधीत ग्राहकाला ₹1,87,507 इतकी व्याजात बचत होऊ शकते.
ही गणना स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या होम लोन EMI कॅल्क्युलेटरच्या आधारे करण्यात आली आहे.
सध्या शेअर बाजारात सुरू असलेली चढ-उतारांची स्थिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील अनिश्चितता आणि विविध जागतिक घडामोडी पाहता, RBI चा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कर्जदारांसाठी ही सकारात्मक संधी ठरू शकते.