मित्रांनो जर तुमचं पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) खातं असेल आणि तुम्हाला त्यात नॉमिनी अपडेट किंवा बदलायचा असेल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी बातमी आहे. सरकारने यासंदर्भात महत्त्वाचे नियम बदलले असून, नॉमिनी अपडेट करण्यासाठी लागणाऱ्या शुल्काची अट आता रद्द करण्यात आली आहे.
सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
२ एप्रिल २०२५ रोजी सरकारने शासकीय बचत प्रोत्साहन सर्वसाधारण नियम, २०१८ मध्ये सुधारणा करत, नॉमिनी अपडेटसाठी आकारलं जाणारं ५० रुपयांचं शुल्क रद्द केल्याचं जाहीर केलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) द्वारे ही माहिती शेअर केली.
आता पीपीएफ खातेदार कोणताही अतिरिक्त खर्च न करता नॉमिनीची माहिती अपडेट करू शकतात.
४ नॉमिनींची सुविधा
बँकिंग सुधारणा विधेयक २०२५ अंतर्गत, खातेदारांना त्यांच्या खात्याशी संबंधित रक्कम, सुरक्षित वस्तू आणि लॉकरसाठी एकूण ४ नॉमिनी जोडण्याची मुभा मिळाली आहे. या बदलामुळे खातेदारांना अधिक सुरक्षितता आणि लवचिकता मिळणार आहे. अर्थमंत्र्यांनी यासंदर्भातील राजपत्र अधिसूचना हिंदी व इंग्रजी भाषेतही प्रसिद्ध केली आहे.
नॉमिनी अपडेट का गरजेचं आहे?
पीपीएफ खातेदाराने नॉमिनीची माहिती अद्ययावत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. खातेदाराच्या मृत्यूनंतर नॉमिनीला खात्यातील रक्कम मिळवणं सुलभ आणि जलद होतं. नॉमिनी नसल्यास, वारसदाराला पैसे मिळवण्यासाठी अनेक प्रक्रिया पार कराव्या लागतात, ज्यामुळे विलंब होतो.
पीपीएफ खात्याचे फायदे
पीपीएफ खाती पोस्ट ऑफिस किंवा बँकेत कोणतीही पात्र व्यक्ती उघडू शकते. तसेच अल्पवयीन मुलांसाठी पालक हे खाते उघडू शकतात. पीपीएफ खात्याची मुदत १५ वर्षांची असते, त्यानंतर संपूर्ण रक्कम काढता येते. पण आवश्यकतेनुसार ही योजना ५-५ वर्षांनी वाढवता येते. मुदतवाढीसाठीचा निर्णय मॅच्युरिटीच्या एका वर्षाआधी घ्यावा लागतो.
दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून पीपीएफ खातं एक अत्यंत विश्वासार्ह पर्याय आहे, जो तुमच्या भविष्याच्या आर्थिक स्थैर्याची हमी देतो.