मंडळी तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत आहात का? जर वापरत असाल, तर त्याच्याशी संबंधित सविस्तर माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. सध्या क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बहुतांश लोक खरेदीसाठी किंवा ऑनलाईन व्यवहार करताना क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचे फायदे. क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर विविध प्रकारच्या ऑफर्स, रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक इत्यादी लाभ मिळतात.
मात्र, हे लक्षात ठेवायला हवे की क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचे कर्ज आहे. त्यामुळे याचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे असते. ठराविक कालावधीनंतर हे कर्ज व्याजासह परत करावे लागते. याशिवाय, कार्ड वापरताना काही अतिरिक्त शुल्क भरावे लागते, ज्याची माहिती अनेकांना नसते.
सर्वप्रथम पाहूया वार्षिक शुल्क काय असते. बहुतांश क्रेडिट कार्डवर पहिल्या वर्षी वार्षिक शुल्क माफ असते, मात्र नंतर हे शुल्क आकारले जाते. ते कार्डाच्या प्रकारानुसार साधारणतः एक हजार रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत असते. व्यवहार शुल्क ही आणखी एक गोष्ट आहे. काही विशिष्ट व्यवहारांसाठी २ ते ४ टक्के शुल्क आकारले जाते.
जर तुम्ही बिल वेळेवर भरले नाही, तर विलंब शुल्क लागू होते. हे शुल्क साधारणतः ५०० ते १००० रुपयांदरम्यान असते. काही लोक आर्थिक अडचणीमुळे बिलाचा फक्त किमान भरणा करतात. अशा वेळी उर्वरित रकमेवर व्याज आकारले जाते आणि बिलाची रक्कम हळूहळू वाढत जाते. त्यामुळे शक्य असल्यास संपूर्ण बिल वेळेवर भरणे नेहमीच चांगले.
क्रेडिट कार्डने ATM मधून पैसे काढल्यास कॅश अॅडव्हान्स शुल्क लागू होते. हे शुल्क २ ते ५ टक्क्यांपर्यंत असते. त्यावर लागणारे व्याजही अधिक असते आणि ते त्वरित लागू होते.
क्रेडिट कार्डच्या आणखी काही प्रकारांबद्दल जाणून घेणे उपयुक्त ठरेल. अॅड-ऑन क्रेडिट कार्ड म्हणजे काय? हे कार्ड मुख्य कार्डधारकाच्या कुटुंबातील सदस्यांना दिले जाते. यामध्ये मुख्य क्रेडिट मर्यादाच वापरली जाते. ज्यांच्याकडे स्वतःचा क्रेडिट स्कोअर नाही, त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरते.
स्पेशल बिगिनर क्रेडिट कार्ड हे नवीन वापरकर्त्यांसाठी उपयुक्त असते. यामध्ये क्रेडिट मर्यादा कमी असते, पण क्रेडिट हिस्ट्री तयार करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. हे सुरुवातीसाठी एक चांगले पर्याय ठरते.
वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. प्रत्यक्षात क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल.