नमस्कार मंडळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर सातत्याने कारवाई करत असते. त्याच अनुषंगाने बुधवारी आरबीआयने अहमदाबादस्थित कलर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक या सहकारी बँकेवर कठोर कारवाई करत तिचा बँकिंग परवाना रद्द केला आहे.
आरबीआयने स्पष्ट केलं की, बँकेकडे पुरेशी रोख रक्कम नाही आणि भविष्यात ती नफा मिळवू शकण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. याशिवाय बँकेची सध्याची आर्थिक स्थिती ठेवीदारांच्या हितासाठी धोकादायक असल्याने, बँकेचं चालू राहणं योग्य नाही.
काय म्हटलंय आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकात?
आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गुजरातमधील सहकारी संस्था रजिस्ट्रारला बँक बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रशासक नेमण्यासंबंधीही सूचना देण्यात आली आहे.
डीआयसीजीसी (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) च्या नियमानुसार ठेवीदारांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीवर विमा संरक्षण मिळेल. बँकेनं सादर केलेल्या आकडेवारीनुसार, ९८.५१ टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवी पूर्णतः परत मिळण्याची शक्यता आहे.
३१ मार्च २०२४ पर्यंत डीआयसीजीसीने ठेवीदारांच्या खात्यांवर विमा रकमेपोटी एकूण १३.९४ कोटी रुपये वितरित केले आहेत.
परवाना रद्द करण्यामागील कारणं
कलर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेने बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट मधील काही महत्त्वाच्या अटींचं पालन करण्यात अपयश पत्करले. बँकिंग परवाना कायम ठेवल्यास जनहितावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका आरबीआयनं घेतली आहे.
परिणामी या कारवाईनंतर बँकेचा सर्व बँकिंग व्यवहार तत्काळ थांबवण्यात आला असून बँकेचा अधिकृत परवाना रद्द झाला आहे.