मंडळी एप्रिल 2025 पासून बँका विविध नियमांमध्ये बदल करणार आहेत. हे बदल बचत खाते, क्रेडिट कार्ड, एटीएम व्यवहार आणि डिजिटल बँकिंगवर परिणाम करतील. या नव्या नियमांची माहिती असल्यास आर्थिक नुकसान टाळता येईल आणि तुम्हाला बँकिंग सेवा अधिक लाभदायक ठरू शकतात.
एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. काही बँकांनी स्वतःच्या एटीएमवर व्यवहारांसाठी फारसा परिणाम होणार नाही, मात्र दुसऱ्या बँकांच्या एटीएमवरून पैसे काढताना मर्यादा घालण्यात आल्या आहेत. ग्राहकांना आता केवळ तीन वेळा मोफत पैसे काढता येतील. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 20 ते 25 टक्के शुल्क भरावे लागेल.
डिजिटल बँकिंग सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी बँका नवे फीचर्स लागू करत आहेत. ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी एआय-आधारित चॅटबॉट्स उपलब्ध होतील. डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन यासारख्या सुरक्षा सुविधा अधिक बळकट केल्या जातील.
किमान शिल्लक रकमेच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि इतर काही बँकांनी शिल्लक रकमेचे निकष शहरी, निमशहरी आणि ग्रामीण शाखांनुसार ठरवले आहेत. किमान शिल्लक रकमेपेक्षा कमी रक्कम शिल्लक असल्यास ग्राहकांना दंड भरावा लागेल.
चेक व्यवहारांसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू केली गेली आहे. पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या चेकसाठी ग्राहकांनी चेकचा क्रमांक, तारीख, लाभार्थ्याचे नाव आणि रक्कम आधीच बँकेला कळवावी लागेल. यामुळे फसवणूक आणि चुकांची शक्यता कमी होईल.
काही बँकांनी बचत खाते आणि मुदत ठेवीवरील व्याजदर बदलले आहेत. बचत खात्यांवरील व्याजदर आता शिल्लक रकमेवर आधारित असतील. जास्त शिल्लक असलेल्या खात्यांवर अधिक व्याजदर मिळण्याची शक्यता आहे.
क्रेडिट कार्डांच्या फायद्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एक्सिस बँक यांसारख्या बँकांनी को-ब्रँड विस्तारा क्रेडिट कार्ड्सवरील फायदे कमी केले आहेत. टिकर व्हाऊचर, रिन्यूअल फायदे आणि माइलस्टोन रिवॉर्ड्स यांसारखे लाभ बंद केले जातील. 18 एप्रिलपासून एक्सिस बँकेच्या विस्तारा कार्ड फायदे बदलणार आहेत.
या बदलांची माहिती असणे आर्थिक निर्णय घेताना उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा शाखेशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवावी.